Thursday, September 20, 2018

धपाटे कसे करायचे ?

 

धपाटे हा थालपीठाशी साधर्म्य असणारा प्रकार,पण थालपीठांइतका केला जात नाही.धपाट्याना थालपीठाला लागते तशी भाजणी लागत नाही. सर्वसाधारण  घरात उपलब्ध पीठ एकत्र करून धपाटे केले जातात. त्याच प्रमाणे यात भाज्या घातल्या जात नाहीत त्यामुळे अगदी पातळ थापता येतात. याला थालपीठां प्रमाणे होल करण्याची आवश्यकता नसते. थोडक्यात याला मसाला भाकरी किंवा मसाला पराठा म्हणता येईल. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने हे धपाटे केले जातात. काही भागात थापून करतात तर काही ठिकाणी लाटून केले जातात. माझे बालपण सोलापूर भागातले, तिथे हे धपाटे अगदी हमखास केले जातात. कर्नाटक पासून झालाच असल्यामुळे अगदी पातळ असे धपाटे, भाकरीप्रमाणे थापून केले जातात. त्यासाठी खास तगडं-पातळ पत्रा मिळतो, त्याचा वापर केला जातो. प्रवासाला निघालो कि आजी अगदी आठवणीने धपाटे आणि शेंगाची चटणी करून घेणार. तसेच वेळामावश्याला धपाटे-मुगाची उसळ-ज्वारीचे आंबील असा बेत असायचा.
 २ प्रकारे हे दांपत्ये कसे करायचे ते सांगणार आहे.
थापून करायच्या धपाट्यांसाठी साहित्य -
२ वाटी ज्वारीचे पीठ
१ वाटी बेसनपीठ
१ मोठा चमचा गव्हाचे पीठ
तीळ
१ छोटा चमचा ओवा
१ मोठा चमचा धणे
१ मोठा चमचा जिरे
कोथिंबीर
४-५ पाकळ्या लसूण
५-६ हिरव्या मिरच्या
१/२ चमचा हळद
पाव चमचा हिंग
मीठ
कृती-
१. सर्व पीठं एकत्र करून त्यात, हळद,हिंग, मीठ घालावे.
२. ओवा-जिरे-धणे-लसूण-हिरवी मिरची-कोथिंबीर यांची पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्यावी.
३. हि पेस्ट पीठामध्ये घालावी.
४. भाकरी प्रमाणे उकळते पाणी घालून पीठं भिजवावे.
५. पिठाच्या गोळ्याला तीळ लावून घ्यावेत. ज्वारीचे पीठं पसरून त्यावर भाकरी प्रमाणे थापून, धपाटे करावेत.
६. भाजताना,भाकरीप्रमाणे प्रथम पाणी लावून घ्यावे. पाणी सुकल्यावर तेल लावून भाजावे.

लाटून करायच्या धपाट्यांसाठी
२ वाटी गव्हाचे पीठ
१ वाटी बेसनपीठ
१ चमचा ज्वारीचे पीठ
१ चमचा लाल तिखट
कोथिंबीर
तीळ
१ छोटा चमचा ओवा
१ मोठा चमचा धणे
१ मोठा चमचा जिरे
४-५ पाकळ्या लसूण
१/२ चमचा हळद
पाव चमचा हिंग
मीठ

कृती -
१. सर्व पीठं एकरतर करून घ्यावीत.मीठ,हळद,हिंग,लाल तिखट,बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.   मिरची ऐवजी लाल तिखट वापरले आहे.
२. ओवा,जिरे, धणे,लसूण पाणी घालून बारीक वाटून घ्यावे.
३. ती पेस्ट पिठात घालावी.
४. पराठ्यांप्रमाणे पीठं मळून घ्यावे.
५. तेल किंवा गव्हाचे पीठ लावून धपाटे लाटावेत.
६. तेल लावून भाजून घ्यावेत.

कोणतीही कोरडी चटणी, लोणचं किंवा मुगाच्या उसळी सोबत धपाटे खूप छान लागतात 
Recipe Video-



Tuesday, September 18, 2018

पौष्टिक  हिरव्या मुगाची उसळ 

 

उसळी म्हणाल्या कि सहसा मोड आलेल्या कडधान्यांच्या उसळी आपण करतो.
याशिवाय जर मोड आणलेली कडधान्य नसतील किंवा थोडासा बदल म्हणून हि आख्ख्या मुगाची उसळ करता येईल.खास करून धपाट्यांसोबत हि मुगाची उसळ केली जाते.धपाटे आणि मुगाची उसळ हे combination  खूप अप्रतिम लागते. कडध्यान्य तर प्रथिनांचा उत्तम स्रोत आहेतच त्यातही आख्खे मूग पचायला हलके असतात. उसळीसाठी साहित्यही खूप जास्त लागत नाही.घरात उपलब्ध अश्या साहित्यात बनते, वेळही कमी लागतो. टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता.हि उसळ. थोडीशी सरबरीत देखील करू शकता. लसूण -मिरची  शिवाय दुसरे काहीच घालत नाहीये, त्यामुळे जास्त प्रमाणात लून -मिरचीचा वापर केला आहे. हि उसळ थोडीशी झणझणीतच छान लागते  

साहित्य
१ वाटी आख्खे हिरवे  मूग
२ मध्यम कांदे
४-५ हिरव्या मिरच्या
८-१० पाकळ्या लसूण
बारीक चिरलेली कोथिंबीर
कढीपत्ता

१. प्रथम मूग खरपूस भाजून घ्यावेत.भाजून घेतल्यामुळे उसळ आणखी खमंग लागते.
२. मुगामध्ये १ ते १ १/२ ग्लास पाणी घालून,मंद आचेवर ६ ते ७ शिट्ट्या घेऊन मूग मऊसर शिजवून घ्यावेत.
३. कढईत २-३ चमचे तेल गरम करून, जिरे-मोहरी-कढीपत्ता-हिंगाची फोडणी तयार करावी.
४. यात बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यावे. कांदा गुलाबीसर झाला कि, लसूण आणि हिरव्या मिरचीची ओबडधोबड अशी पेस्ट करून  घालावी. बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. सर्व थोडेसे परतून घ्यावे. हळद घालावी.
५. शिजवलेले मूग घालावेत. चवीप्रमाणे मूग, छोटा गुळाचा खडा घालावा.
६. पाणी जर पूर्णपणे आटले असेल तर लागेल तसे पाव ते अर्धा ग्लास कोमट घालावे.
७. उकळी आल्यावर ,मंद आचेवर २ मिनिटे उसळ शिजू द्यावी.
संपूर्ण कृतीचा  Video:



Tuesday, August 8, 2017

सांडग्याची सुकी भाजी | Sandga Bhaji | Sandgyachi Bhaji

सांडग्याची सुकी भाजी | Sandga Bhaji | Sandgyachi Bhaji 


नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन  मध्ये !!
सांडगे हा वाळवणाचा पदार्थ असा एक अत्यंत उपयोगी आहे कि जो फक्त तोंडीलावणं म्हणून न वापरता कधीही चटकदार अशी भाजी बनवली जाऊ शकते.उन्हाळयात करून ठेवलेले सांडग्यांची वर्षभरात कधीही भाजी भाजी बनवू शकता. जेव्हा कधीही फ्रिज मध्ये भाजी नसेल, आणि काही तरी झणझणीत खाण्याची इच्छा झाली कि बरणीतून सांडगे काढून कधीही सांडग्याची भाजी करता येते. शिवाय भाजी निवडा, चिरा या भानगडी नसल्यामुळे कमीत कमी वेळेत होते. आवडीप्रमाणे सांडग्याची भाजी सुकी किंवा थोडी रस्सेदार बनवू शकतो. सांडग्याची झणझणीत भाजी, भाकरी जोडीला ताक .....खरंच अप्रतिम  !!!

सांडग्याच्या भाजी चे साहित्य- Ingredients For Sandgyachi Bhaji

२ वाट्या सांडगे,
२ मोट्ठे कांदे(बारीक चिरून ),
१ टोमॅटो(बारीक चिरून ),
२-३ tsp खरपूस भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट,
घरगुती काळा मसाला(कांदा लसूण मसाला)
फोडणीसाठी जिरे, मोहरी कढीपत्ता(ऐच्छिक)

 

कृती- How to make Sandgyachi Bhaji

१.कढईत १ tsp तेल गरम करून त्यात सांडगे भाजून घ्यावेत. सांडगे भाजताना सुरवातीला गॅस माध्यम आचेवर असावा व नंतर तो मंद आचेवर करावा. म्हणजे सांडगे खरपूस भाजले जातील.
सांडग्यांचा रंग बदलून तो सोनेरी झाला व ते छान आतपर्यंत भाजले गेले कि कढईतून काढावेत.
२. त्याच कढईत थोडेसे तेल घालावे. सांडगे तेलात भाजले असल्यामुळे त्याला असलेले तेल लक्षात घेऊन बेताचेच कांदा परतेल इतपत तेल घालावे. तेलाला जिरे , मोहरी कढीपत्त्याची फोडणी द्यावी.
३. आता यात चिरलेला कांदा घालावा. कांदा गुलाबीसर रंगावर परतून घ्यावा.
४. यात छोटा चमचा हळद घालावी. चिरलेला टोमॅटॊ घालून परतून घ्यावे. आवडीनुसार १ ते २ चमचे कांदा-लसूण मसाला/ काळा मसाला यात घालावा. सर्व व्यवस्थित परतून घ्यावे. काळा मसाला नसल्यास लाल तिखट घातले तरी चालेल.

५. भाजलेले सांडगे घळलावेत. सर्व एकदा परतून यात गरजेनुसार कोमट पाणी घालावे. चवीपुरते(सांडग्याचे मीठ लक्षात घेऊन ) मीठ घालावे.
६. सांडगे ५ मिनिटे झाकण ठेवून शिजू द्यावेत. सांडग्याचे शिजणे हे सांडग्यांचा आकार, पिठाचा रवाळपणा व ते किती खरपूस भाजले आहेत यावर ठरते. जर सांडगे मोट्ठे असतील तर शिजायला वेळ लागतो.
७. एखादा सांडगा घेऊन तो बोटाने आतपर्यंत शिजला आहे का ते पाहावे. सांडगा खूप जास्त देखील मऊ शिजवू नये. शेवटी शेंगदाण्याचा कूट घालावा. सर्व व्यवस्थित मिक्स करून शेवटी गॅस बंद करावा.

संपूर्ण कृतीचा Video: Sandga Bhaji | Sandgyachi Bhaji 


Monday, April 17, 2017

कैरीची कांदा घालून चटणी  | Kairi Chutney | Raw Mango-Onion Chutney

 

नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन ब्लॉग मध्ये!!
आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कैरीची कांदा घालून बनवलेली चटणी.
उन्हाळ्याच्या सुरवातीपासून बाजारात कैरी उपलब्ध होऊ लागली कि कैरीचे विविध पदार्थ बनवले जातात. थंडगार पन्ह्या पासून ते कैरीची डाळ, चटकदार लोणची, विविध चटण्यां पर्यंत रोज कैरीचे पदार्थ बनवले जातात.त्यांपैकीच एक माझी  आवडती कैरीची रेसिपी म्हणजे कांदा घालून केलेली कैरीची चटणी. आंबट-गोड आणि तिखट अशी हि चटणी तुम्ही देखील नक्की करून बघा.



साहित्य :                               

१ कैरी
१ मोठ्ठा कांदा
५-६ सोललेल्या लसणाच्या पाकळ्या 
थोडासा गूळ
जिरे-मोहरी,
हिंग ,
कढीपत्ता,
लाल तिखट,
भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट.
बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती:
१. कैरीची साल काढून बारीक तुकडे करावेत. कैरी खुप आंबट असेल तर कमी प्रमाणात वापरावी.
२.  कांदा बारीक चिरून घ्यावा.
३. मिक्सर च्या छोट्या भांड्यात प्रथम १ छोटा चमचा जिरे,५-६ लसणाच्या पाकळ्या,कैरीचे तुकडे,
 आणि चवीपुरते मीठ घालून बारीक वाटून घ्यावे. वाटताना पाणी वापरू नये.
४.यात बारीक चिरलेला कांदा, कैरीच्या आंबटपणानुसार १ चमचा बारीक केलेला गूळ घालावा. आवडीनुसार १ चमचा लाल तिखट यात घालावे. रंग छान येण्यासाठी १/२ चमचा काश्मिरी लाल तिखट यात घालू शकता.
५. सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात थोडेसे मिक्स करून पुन्हा एकदा पाणी न घालता वाटून घ्या.


६.बाउल मध्ये हि चटणी काढून यात १ चमचा शेंगदाण्याचा कूट घालून मिक्स करावे.
७. थोडेसे तेल गरम करून जिरे-मोहरी-हिंग-कढीपत्त्याची कडकडीत फोडणी चटणीला द्यावी.
तयार आहे चटपटीत अशी कैरीची चटणी. या चटणीत कच्चा कांदा वापरला असल्यामुळे ती ताजीच करून दिवसभरात संपवावी.
संपूर्ण कृतीचा video : 


 



Tuesday, March 7, 2017

कढीपत्त्याची चटणी 

नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन ब्लॉग मध्ये!
आज एक वेगळ्या प्रकारची चटणी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे.
ती म्हणजे कढीपत्त्याची चटणी. रोजच्या फोडणीत असणारा कढीपत्ता, भाजी किंवा पोहे खाताना शक्यतो बाजूला काढून टाकला जातो मग त्याची चटणी कशी लागेल? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल.पण कढीपत्त्याची चटणी अतिशय स्वादिष्ट लागते. भाताबरोबर किंवा तोंडीलावणं म्हणून हि चटणी छान लागते.दह्यामध्ये कढीपत्त्याची चटणी घालून ती पोळी अथवा भाकरी सोबत खाऊ शकता.तसेच सुक्या भाज्यांना देखील हि चटणी वरून घालून तूच स्वाद वाढवू शकता. हि सुकी चटणी असून १५ दिवस चांगली राहते तसेच फ्रिज मध्ये ठेवल्यास अजून जास्त टिकते. कढीपत्ता आरोग्याच्या दृष्टितने विशेषतः केसांच्या आरोग्यासाठी कढीपत्ता अतिशय उपयुक्त आहे. केस काळे राहावे आणि गळू नयेत म्हणून कढीपत्ता अतिशय गुणकारी आहे. चटणीच्या निमित्ताने कढीपत्ता खाण्यात येतो.

साहित्य:                              
भरपूरसा कढीपत्ता
तीळ
सुक खोबर
जिरे
लसूण
लाल तिखट


कृती:
१. प्रथम कढीपत्त्याची पानं काढून घ्यावीत. कढईत ३-४ चमचे तेल गरम करून त्यात हि पानं थोडी-थोडी करून तळून घ्यावीत. पानं चिवड्यासाठी तळतो तशी  कुरकुरीत तळली गेली पाहिजेत.
२. तव्यावर थोडेसे तेल गरम करून त्यावर हि कढीपत्त्याची पानं मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजली तरी चालतील.फक्त याला खूप वेळ लागतो त्यामुळे याठिकाणी मी पानं तळून घेतली आहेत.
३. आता तळलेली पानं टिश्यू पेपर वर निथळून घ्यावीत.यावर १ छोटा चमचा हिंग टाका.

४.उरलेल्या तेलात सुक्या खोबऱ्याचे काप तळून घ्यावेत. तुम्हाला जर कढीपत्ता अजिबातच आवडत नसेल तर खोबऱ्याचे प्रमाण चटणीत जास्त ठेवा.
५.  ४-५  लसणाच्या कुड्या तळून घ्याव्यात.तसेच जिरे आणि तीळ देखील तळून घ्यावेत.जिरे आणि तीळ भाजून घेतले तरी चालतील.
६ आता मिक्सर च्या छोट्या भांड्यात प्रथम जिरे-खोबर-लसूण बारीक करून घ्यावे. नंतर यात तळलेली पानं, तिखट आणि मीठ  टाकून फक्त १-२ वेळा मिक्सर फिरवून पानं खूप बारीक न वाटता ओबडधोबड वाटून घ्यावीत. 

७. मिश्रण बाउल मध्ये काढून घ्या. यात तीळ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार आहे कढीपत्त्याची खमंग चटणी.
संपूर्ण कृतीचा video : 



Wednesday, March 1, 2017

थापट वडी

 

नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन ब्लॉग मध्ये!!
आज मी तुमच्याबरोबर शेअर  करणार थापट वडी ची रेसिपी. हि पारंपरिक वडी वेगवेगळ्या भागात वेगवेळ्या नावाने ओळखली जाते. मासवडी, पाटवडी अश्या विविध नावाने ती ओळखली जाते. हि बेसन ची वडी असून, ती हाताने थापून बनवतात त्यामुळे तिला थापट वडी म्हणतात. ह्या वड्या साईड डिश म्हणून छान लागतात, त्याचप्रमाणे जर याच्याबरोबर सार बनवले कि भाजी म्हणू देखील खाता येते.
साहित्य:
१ कप बेसनपीठ
फोडणीसाठी जिरे,मोहरी, हिंग,हळद
लसूण-हिरवी मिरची पेस्ट
खसखस
सुक्या खोबऱ्याचा कीस
बारीक चिरलेली कोथिंबीर

सार बनवण्यासाठी
बारीक चिरलेला कांदा
टोमॅटो
आलं-लसूण-कोथिंबीर पेस्ट

वडी बनवण्याची कृती :
१. कढईत एक मोठ्ठा चमचा तेल गरम करून त्यात मोहरी-जिरे टाका.मोहरी तडतडली की हिंग आणि लसूण मिरची ची पेस्ट, शेवटी हळद टाका.
२.आता फोडणीत (१ कप बेसनसाठी) २ कप  पाणी टाका.
३.गॅस मोठ्ठा ठेवा.पाणी उकळायला लागल्यावर त्यात बेसनपीठ टाका.बेसनपीठ एकदम न टाकता थोडे थोडे टाकायचे आहे. तसेच ते सतत हलवावे  उकळत्या पाण्यात पीठ टाकल्यामुळे गुठळ्या कमी होतील.तसेच ते सतत हलवावे. बेसनपीठ पाण्यात कालवून देखील फोडणीत टाकू शकता,पण उकळत्या पाण्यात बेसन घातलेली वडी अधिक छान लागते..
४. गॅस बारीक करा. पीठ पळीने फेटत राहा. पाणी आटल्यावर झाकण घालून पीठ ५ मिनिटे शिजू द्या. ५ मिनिटानंतर झाकण काढून  पीठ  पुन्हा फेटून घ्या. परत २ मिनिटे झाकण घालून शिजू द्या.
६ अश्याप्रकारे पीठ घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. पीठ थोडे थंड होऊ द्या.पीठ कोमट असताना ताटलीला तेल लावून त्यावर वड्या थापून घ्या. वड्या हाताला पाणी लावून कोमट असताना थापाव्यात.पीठ जसे जसे थंड होईल तसे ते अधिक घट्ट होऊन वड्या पडतील.त्याचप्रमाणे त्या थोड्या जाडसर असाव्यात.
७. भाजलेली खसखस टाकून ती हाताने थोडा दाब देऊन वड्यांवर पेरा. शंकरपाळी च्या आकारात वड्या चाकूने कापा.बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खोबऱ्याचा कीस टाकून वड्या सर्व्ह करा. या वड्यानुसत्या देखील छान लागतात. याबरोबर सार अथवा आमटी केली कि भाजी म्हणून देखील खाता येते.

सार बनवण्याची कृती :

८. वड्या केल्यानंतर कढई ला जे बेसन पीठ चिकटले असेल त्यात पाणी घालून उकळून घ्या.
९. पातेल्यात तेल गरम करून त्यात कांदा आणि टोमॅटो परतून घ्या. यात आलं-लसूण-कोथिंबीर पेस्ट टाका.
१०. मसाल्याला तेल सुटू लागले कि यात हळद, मीठ आणि लाल तिखट टाका. यात उकळलेले बेसनाचे पाणी टाका. लागेल तेवढे पाणी यात घाला. उकळले कि सार वड्यांसोबत सर्व्ह करा.

संपूर्ण कृतीचा video :


Wednesday, February 22, 2017

कमी तेलात बनवलेले साबुदाणा वडे | साबुदाणा टिक्की 



नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन ब्लॉग मध्ये !!
उपवास असो व नसो साबुदाणा वडे सगळ्यांनाच आवडतात.गरम-गरम कुरकुरीत साबुदाणा वडे, उपवासाच्या चटणीबरोबर खाण्यासाठी उपवास असणं गरजेचं नाही. तेलकट असल्यामुळे बऱ्याचवेळा वड्याऐवजी खिचडी करतो. जर न तळता कमी तेलात वडे बनवायचे असतील तर ते आप्पेपात्रात बनवावेत. यामुळे कमी तेलात तितकेच स्वादिष्ट साबुदाणा वडे बनतात.
यासाठी लागणार साहित्य आहे
१ मोठी वाटी भिजवलेला साबुदाणा
१/२ वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
२ उकडलेले बटाटे
१ चमचा मिरची-जिरे पेस्ट
कोथिंबीर
लिंबू
कृती.
१. साबुदाणा आदल्या रात्री भिजवून  घ्यावा. यासाठी प्रथम साबुदाणा धुवून,निथळून घ्यावा. मग त्यात साबुदाणा हलकासा भिजेल इतपत म्हणजे साबुदाण्याच्या लेवल पर्यत पाणी ठेवून, झाकण ठेवून तो रात्रभर(३-४ तास )भिजू द्यावा. भिजल्यानंतर साबुदाणा छान फुलून कोरडा झाला पाहिजे.
२. शेंगदाणे भाजून त्याचा कूट करावा. खिचडी साठी अथवा वड्यांसाठी शेंगदाणे भाजताना प्रथम ते माध्यम आचेवर थोड्यावेळ भाजावेत, नंतर मंद आचेवर छान खरपूस वास सुटेपर्यंत भाजावेत. मंद आचेवर भाजल्यामुळे शेंगदाणे आतपर्यंत, छान भाजले जातात. नंतर ते पूर्ण थंड होऊ द्यावेत आणि मग त्याचा जाडसर कूट करावा.

३ भिजवलेल्या साबुदाण्यात शेंगदाण्याचा कूट घाला व व्यवस्थित मिक्स करा. सगळ्या साबुदाण्याला व्यवस्थित कूट लागेल इतपत कूट घालावा. साधारण १/२ वाटी कूट, १ वाटी साबुदाण्याला लागेल. साबुदाणा शिजला कि चिकट  होतो, त्यामुळे कूटाने चिकटपणा कमी होतो म्हणून वड्यांसाठी थोडा जास्त कूट घालावा.
४. आता यात उकडलेला बटाटा कुस्करून घाला.पाणी न घालता साबुदाणा वड्याचे पीठ मळता येईल इतपत बटाटा लागेल.
५. यात चवीपुरते मीठ, जिरे-मिरची ची पेस्ट आणि बारीक चिरलेली  कोथिंबीर टाका. १ चमचा लिंबाचा रस घाला.
६.सर्व मिश्रण व्यवस्थित मळून घ्या.
७.आता हाताला तेल लावून पिठाचे आप्पेपात्रात बसतील अश्या आकाराचे गोळे करा.दोन्ही हातांनी गोळ्यांना मधोमध दाब द्या. सर्व पिठाचे गोळे बनवून घ्या.

८. आप्पेपात्र माध्यम आचेवर पूर्णपणे गरम करून घ्या. चमच्याने यात तेल सोडा. याठिकाणी तेलाऐवजी तूप देखील वापरता येईल. पहिल्या घाण्याला थोडे जास्त तेल लागेल नंतर तेल कमी-कमी लागत जाईल. शेवटी-शेवटी तेल न घालता देखील छान वडे बनतील. त्याचप्रमाणे नॉनस्टिक चे आप्पेपात्र असेल तरीदेखील कमी तेल लागेल. आप्प्याचं साचा मोठ्ठा असेल तर छान मोठ्ठे वडे करता येतील.
९. यात वडे अलगद सोडा. झाकण घालून ७-८ मिनिटे शिजू द्या. वडे छान खरपूस रंगाचे झाले कि आपपत्रापासून आपोआप सुटतील. चिकटले असतील तर थोडे अजून शेकू द्या नंतर चमच्याने हलके सोडवून घ्या.

१०. दुसऱ्या बाजूनेदेखील वडे शेकून घ्या. शक्यतो घालावे तेल लागणार नाही.
११. वड्यासोबत खाण्यासाठी झटपट चटणी बनवायची असल्यास दही, शेंगदाण्याचा कूट, जिरे, मीठ आणि लाल तिखट मिक्सरमध्ये फिरवून चटणी करू शकता.
१२. गरम-गरम वडे चटणीबरोबर सर्व्ह करा.
संपूर्ण कृतीचा video :